आरपीएफच्या जवानांमुळे ६६ लोकांना जीवनदान; ऑपरेशन अमानत अंतर्गत २.७७ कोटींचे सामन परत

आरपीएफच्या जवानांमुळे गेल्या सात महिन्यांत तब्बल ६६ प्रवाशांना जीवनदान मिळाले आहे.
आरपीएफच्या जवानांमुळे ६६ लोकांना जीवनदान; ऑपरेशन अमानत अंतर्गत २.७७ कोटींचे सामन परत

मुंबई : घाईगडबडीत लोकल, मेल एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात, आत्महत्या करण्याचा प्रयत्न यात अनेकदा प्रवाशांच्या जीवावर बेतते. मात्र रेल्वे स्थानकांत कर्तव्यदक्ष आरपीएफच्या जवानांमुळे गेल्या सात महिन्यांत तब्बल ६६ प्रवाशांना जीवनदान मिळाले आहे. यात मुंबई, पुणे नागपूर विभागात प्रवाशांना जीवनदान मिळाले आहे, तर ऑपरेशन अमानत अंतर्गत ८५८ प्रवाशांचे २.७७ कोटींचे सामान प्रवाशांना परत करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात आणि केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे, तर जीव वाचवणारे, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्यूअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावत असतात.

रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, 'अमानत' या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे आणि त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने, रोख इ. परत मिळवून दिले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन 'अमानत' अंतर्गत, आरपीएफने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून दिले आहे. या ८५७ प्रवाशांपैकी ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

'मिशन जीवन रक्षक'

एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी 'मिशन जीवन रक्षक' चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचवले आहेत. यात मुंबई विभागात १९, भुसावळ विभागात १३, नागपूर विभागात १४, आणि सोलापूर विभागात ५ पुणे विभागात १५ जणांचा समावेश आहे. आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in