मुंबई : दुर्घटनाग्रस्त होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले, त्या पेट्रोल पंपाखाली ४० हजार लिटर पेट्रोल, ३० हजार लिटर डिझेल अन् ३० हजार किलो गॅसचा साठा आहे. पेट्रोल पंपावर कोसळलेले होर्डिंग हटवण्यात आले असले तरी पेट्रोल पंपाखाली ज्वलनशील इंधन असल्याने सुरक्षेसाठी अग्निशमन दल व पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
घाटकोपरमधील पडलेल्या होर्डिंगचा ढिगारा हटवल्यानंतर मुंबई महापालिकेने आता पेट्रोल पंप आणि खराब झालेल्या वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची असून तसे पत्र पालिकेने लिहिले आहे. बीपीसीएल मुंबईचे तांत्रिक व्यवस्थापक मौलिक कपाडिया यांना हे पत्र पाठवले असून पेट्रोल पंपाखाली असलेल्या इंधनाच्या सुरक्षेसाठी पोलिसांची फोज तैनात करा, असे पत्रात नमूद केले आहे.
अतिरिक्त आयुक्तांनी बीपीसीएलचे महाव्यवस्थापक रवी कुमार यांनाही पत्र लिहित होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य पूर्ण झाले असून वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा. पेट्रोलपंपाच्या जागेवर असामाजिक तत्त्व आणि अतिक्रमण होऊ नये, यासाठी बॅरिकेड्स लावून सुरक्षित करा, असे पत्रात म्हटले आहे.
भविष्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पेट्रोलपंपाच्या टाकीत साठवलेले इंधन काढून टाकावे व त्यात पाणी भरावे, असे निर्देश दिले आहेत. पेट्रोल पंपाच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलासह मनपाचे काही कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले.