मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीसाठी ७०० कोटींचा खर्च? दोन महिने उलटले तरी अंतिम अहवालाची प्रतीक्षा

मलबार हिल जलाशय १३६ वर्षे जुना झाला असला तरी सद्यस्थितीत मजबूत स्थितीत आहे, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिला आहे. तरी जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ७०० कोटींचा खर्च का, असा सवाल...
मलबार हिल जलाशय पुनर्बांधणीसाठी ७०० कोटींचा खर्च? दोन महिने उलटले तरी अंतिम अहवालाची प्रतीक्षा

मुंबई : मलबार हिल जलाशय १३६ वर्षे जुना झाला असला तरी सद्यस्थितीत मजबूत स्थितीत आहे, असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिला आहे. तरी जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ७०० कोटींचा खर्च का, असा सवाल मलबार हिल येथील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. दीड महिना उलटला तरी अंतिम अहवाल सादर करण्यात आला नसताना तज्ज्ञ समितीत सल्लागाराची नियुक्ती म्हणजे तज्ज्ञ समितीने दिलेल्या अंतरिम अहवालात छेडछाड करण्याचा पालिकेचा डाव, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, अंतिम अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मलबार हिलचे स्थानिक नागरिक डॉ. निलेश बक्षी यांनी दिली.

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प २०१७ मध्ये १८५.९४ कोटी इतका प्रस्तावित होता. मात्र तो आता ७०० कोटींवर पोहोचला आहे. या शिवाय मलबार हिल जलाशयाच्या ५ टाक्यांची जलधारण क्षमता एकूण १४७.७८ दशलक्ष लिटर असताना त्यामधील केवळ ७९.७३ दशलक्ष लिटर पाणीसाठाच वापरला जातो. मग नवीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट पालिका प्रशासनाने का घातला, असा प्रश्न मलबार हिल जलशयाच्या पुनर्बाधणीला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. जलाशयाच्या नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल ३९३ झाडांची कत्तल होणार असून त्यांनतर ओढवणाऱ्या परिणामांना कसे सामोरे जाणार, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

ब्रिटिशकालीन असलेले मलबार हिल जलाशय तब्बल १३६ वर्षे जुने आहे. सध्याच्या फिरोजशाह मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली सन १८८७ मध्ये बांधलेल्या या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड, ग्रँट रोडमधील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. दक्षिण मुंबईची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन या जलाशयाची पुनर्बांधणी प्रस्तावित असून त्यासाठी ६९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुनर्बांधणीनंतर सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पाच जलाशयांची क्षमता

क्षमता आणि वापर ( दशलक्ष लिटर)

जलाशय १ - ३५.७८ - १८.०८ दशलक्ष लिटर

जलाशय २ - २१.३२ - १०.७७ दशलक्ष लिटर

जलाशय सी १ - १७.८६ - १२ दशलक्ष लिटर

जलाशय २ ए - ४८.२३ - २७.४३ दशलक्ष लिटर

जलाशय २ बी - ३१.४२ - १५.४९ दशलक्ष लिटर

एकूण क्षमता - १४७ दशलक्ष लिटर

एकूण पाण्याचा वापर- ७९.७३ दशलक्ष लिटर

logo
marathi.freepressjournal.in