७०० डबलडेकर बसेसना तूर्तास ब्रेक कॉसिस मोबॅलिटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस

बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांची माहिती
७०० डबलडेकर बसेसना तूर्तास ब्रेक कॉसिस मोबॅलिटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस

मुंबई : स्विच मोबॅलिटी व कॉसिस मोबॅलिटी कंपनी या दोन कंपन्यांकडून एकूण ९०० वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. स्विच मोबॅलिटी कंपनीकडून एकूण २०० बसेसचा पुरवठा होणार असून, सद्यस्थितीत १२ बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे; मात्र कॉसिस मोबॅलिटी कंपनीकडून अद्याप एकही डबलडेकर बसचा पुरवठा न झाल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.

डबल डेकर बसेस मुंबईची शान असून, सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २० डबल डेकर बसेस आहेत; मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन ९०० वातानुकूलित डबल डेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २०० बसेस पैकी १२ बसेसचा पुरवठा स्विच मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात आला असून, उर्वरित बसेस टप्याटप्याने करण्यात येत आहे. तर ७०० बसेस काॅसिस मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात येणार आहे; मात्र वर्ष उलटून गेले तरी बसेसचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे कॉसिस मोबॅलिटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात उशीर झाला असून, कंपनीवर का कारवाई करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सिंघल यांनी सांगितले.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १९ डबलडेकर बसेस असून, त्या १५ वर्षें जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या टप्याटप्याने भंगारात काढण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in