मुंबईतील ७/११ च्या खटल्याला आणखी विलंब होणार : न्यायाधीशांची बदली

सप्टेंबर २०१५ मध्ये विशेष मोक्का न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा व सात जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती

मुंबई : मुंबईतील ७/११ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील खटल्याला आणखी विलंब होणार आहे. कारण हा खटला चालवणारे न्यायाधीश नितीन सांब्रे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.

न्या. सांब्रे हे नागपूर खंडपीठात १ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सांब्रे यांची ६ जानेवारी २०१४ रोजी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ते १८ डिसेंबर २०२९ रोजी निवृत्त होणार आहेत.

यंदाच्या ऑक्टोबरपासून न्या. सांब्रे व न्या. राजेश पाटील यांनी चार आरोपींच्या मृत्युदंडाच्या शिक्षेबाबत सुनावणी सुरू केली. या आरोपींनी त्यांच्या शिक्षेच्या विरोधात अपील केले होते. ८ सप्टेंबर रोजी न्या. सांब्रे यांनी ५ ऑक्टोबरपासून रोजच्या रोज सुनावणी सुरू केली. आठ वर्षांनंतर उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू केली. विशेष न्यायालयाने पाच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

११ जुलै २००६ रोजी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात सात ठिकाणी आरडीएक्सचे स्फोट झाले होते. ११ मिनिटांत १८९ जणांचा बळी, तर ८०० जण जखमी झाले होते.

सप्टेंबर २०१५ मध्ये विशेष मोक्का न्यायालयाने पाच जणांना फाशीची शिक्षा व सात जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयाने या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. मोहम्मद फैजल शेख, इतिहेशम सिद्धीकी, नावीद हुसैन खान, असिफ खान यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले, तर या प्रकरणातील आरोपी कमल अहमद अन्सारी हा आरोपी २०२२ मध्ये नागपूर तुरुंगात मरण पावला, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजीद शफी, शेख अस्लम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, मुझ्झमैल शेख, सोहेल मोहम्मद शेख, झमीर अहमद शेख यांनी जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in