फुकट्या प्रवाशांकडून ७.४३ कोटींचा दंड वसूल

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७६.७० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
फुकट्या प्रवाशांकडून ७.४३ कोटींचा दंड वसूल

मुंबई : विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ७.४३ कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७६.७० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

विना तिकीट, अनियमित प्रवास कायद्याने गुन्हा आहे, असा इशारा देऊन ही दुर्लक्ष करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. २० जानेवारी २०२४ पर्यंत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये विना तिकीट अनियमित प्रवास अशी एकूण १.८५ लाख प्रकरणांची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १.१४ लाख प्रकरणांची नोंद झाली होती.

एप्रिल २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत वातानुकूलित लोकलमध्ये ३३८५१ विना तिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत २२,१३२ प्रकरणांची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२० दिवसांत ५९ लाखांचा दंड वसूल

१ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत, विनातिकीट आणि अनियमित तिकीटांची एकूण १७,८४७ प्रकरणे आणि सामानाचे बुक न केलेले आणि अनियमित बुकिंग आढळून आले. फुकटे व अनियमित प्रवास करणाऱ्यांकडून ५९.२४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्या २३२७ जणांकडून ७.८९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in