मुंबई : म्हाडा मुंबई मंडाळाने २०३०घरांच्या विक्रीसाठी दिलेल्या जाहिरातीला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकुण ७५ हजार अर्जदारांनी या घरांसाठ ऑनलाईन अर्ज केले आहेत. यांपैकी ५५ हजार अर्जदारांनी अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कमही जमा केली आहे़ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत असून रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे.
लॉटरीचे ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ झाला. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.
१९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे. २७ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडत झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
८ ऑक्टोबरला लॉटरी
लॉटरीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय लॉटरी काढली जाणार आहे.