१ जूनपासून पावसामुळे महाराष्ट्रात ७६ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
 १ जूनपासून पावसामुळे महाराष्ट्रात ७६ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात १ जूनपासून पावसामुळे झालेल्या दुर्घटनांत तब्बल ७६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत नऊ जण मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रविवारी दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात जवळपास ८३८ घरांचे नुकसान झाले असून ४९१६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्याच्या पुनर्वसन विभागाने ठिकठिकाणी ३५ मदत केंद्रे उभारली आहेत. पावसामुळे अथवा पुरामुळे १ जूनपासून राज्यात १२५ प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहितीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत देशातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई, ठाणे आणि राज्यातील अन्य ठिकाणी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्याचबरोबर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी १० जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी मुंबईत पाऊसधारा कोसळल्याने अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. रस्त्यावरील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला होता. तसेच घाटकोपरच्या पंचशील नगर येथे दरड कोसळल्याने एका घराचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याजवळ दरड कोसळली होती.

राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी पार केली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नदी पूररेषेखाली आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in