पीएचडी तरी उपेक्षितच; संशोधक न्यायाच्या प्रतीक्षेत

सरकारदरबारी सुनवाई नाही, विविध राजकीय पक्षांचे दुर्लक्ष, बार्टीने पात्र ठरवून निवडलेल्या त्या विद्यार्थ्यांना फेलोशीप पासून दोन वर्षे वंचित ठेवण्यात आले आहे.
पीएचडी तरी उपेक्षितच; संशोधक न्यायाच्या प्रतीक्षेत

मुंबई : अनुसूचित जातींतील २०२२ सालातील पीएचडीचे ७६३ संशोधक फेलोशीपसाठी गेले तब्बल पाच महिने घरदार, कुटुंब, अभ्यास वाऱ्यावर सोडून लढत आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील संशोधक गेल्या ५५ दिवसांपासून आझाद मैदानात लढा देत आहेत.

सरकारदरबारी सुनवाई नाही, विविध राजकीय पक्षांचे दुर्लक्ष, बार्टीने पात्र ठरवून निवडलेल्या त्या विद्यार्थ्यांना फेलोशीप पासून दोन वर्षे वंचित ठेवण्यात आले आहे. आझाद मैदानात लढा देत असून न्याय न मिळाल्यास सत्ताधारी पक्षाला प्रचार बंदी घालण्यात येईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार आणि दलित चळवळीतील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिवाकर शेजवळ यांनी संशोधकांच्या वतीने फेलोशिपच्या प्रश्नाकडे राहुल गांधी यांचे ईमेल वर एक पत्र पाठवून लक्ष वेधले आहे.

काँग्रेसचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत काँग्रेस आमदार प्रा. वर्षा गायकवाड हे दलित नेते आहेत. तरीही या पक्षातील कुण्या नेत्याने दलित संशोधकांवर होणारा अन्याय राहुल गांधींपर्यंत पोहोचवला का, असा सवाल पत्रात विचारण्यात आला आहे. त्या पत्राची प्रत सोनिया गांधी आणि खर्गे यांनाही शेजवळ यांनी पाठवली आहे. पीएचडी संशोधकांच्या फेलोशीपसहित दलित समाजाच्या एकाही प्रश्नावर काँग्रेससह कुठल्याही पक्षाच्या राखीव मतदरसंघांतील आमदारांनी आजवर कधी तोंड उघडले नाही, याकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सारथी या संस्थेने २०२२ च्या ८५१ मराठा विद्यार्थ्यांना २१ सप्टेंबर २०२२ च्या पत्रानुसार फेलोशीप मंजूर करून रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली आहे. तसेच 'महाज्योती' या संस्थेनेसुद्धा १ हजार २२६ ओबीसी विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबर २०२२ च्या पत्रानुसार फेलोशिप मंजूर करून रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली आहे. मग तोच न्याय बार्टीकडील आम्ही अनुसूचित जातींच्या २०२२ च्या ७६३ संशोधकांना का नाही? असा सवाल यवतमाळ येथील संशोधक पल्लवी गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

महिनाभरापासून धरणे

फेलोशीपच्या मागणीसाठी तीन महिन्यांहून अधिक काळ पुण्यातील बार्टीच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर संशोधकांनी मुंबईत येऊन महिनाभरापासून आझाद मैदानात धरणे धरले आहे. मात्र राज्य सरकारने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष चालवले आहे, असे सीमा वानखेडे, पल्लवी गायकवाड, वर्षा जाधव, प्रकाश पट्टेकर, प्रकाश तारू या तरुण संशोधकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in