घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून ८ जण ठार, ६० जखमी

मुंबईत वादळी वाऱ्यांनी थैमान घातले असताना घाटकोपर छेडा नगर येथे १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होडिॅग सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जवळील पेट्रोल पंपावर कोसळले.
घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून ८ जण ठार, ६० जखमी
Published on

मुंबईत वादळी वाऱ्यांनी थैमान घातले असताना घाटकोपर छेडा नगर येथे १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होडिॅग सोमवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जवळील पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत होडिॅग खाली अडकलेल्या १०० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ६० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, रेल्वे हद्दीत महाकाय होडिॅग बेकायदा असल्याने जीआरपी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

घाटकोपर छेडानगर येथे कोसळलेले हे होर्डिंग रेल्वे हद्दीत बेकायदेशीररीत्या उभे होते. या ठिकाणी नियमानुसार ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित कंपनीला पालिकेने दिली होती. मात्र, याकडे संबंधित ‘इगो मीडिया’ कंपनीने दुर्लक्ष करीत २२ एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. याबाबत आलेल्या तक्रारींनंतर पालिकेने लोहमार्ग आयुक्तालयाकडे तक्रारही दाखल केली होती. शिवाय संबंधित कंपनीने होर्डिंग दिसण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केला होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेने मे महिन्यात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली हाती. या दुर्घटनेमुळे पालिकेने रेल्वेसह संबंधित आस्थापनांना नोटीस बजावली असून एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, होर्डिंग कंपनीने पालिकेच्या नोटीसकडे केलेली दुर्लक्ष, लोहमार्ग आयुक्तांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली, याची मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात जाऊन संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेत, अग्निशमन दलाला तातडीने मदतकार्य करण्याचे व हॉस्पिटलला येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले.

मृतांना वारसांना पाच लाखांची मदत

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

घाटकोपर छेडा नगर येथे महाकाय होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत तेथील स्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यावेळी शिंदे म्हणाले.

मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्याने झालेली घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in