पाच वर्षांत आठ लाख घरे; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन; म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सोडत

नीती आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगर प्रदेशात गृहनिर्माण ग्रोथ हब प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
पाच वर्षांत आठ लाख घरे; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन; म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सोडत
एक्स @mieknathshinde
Published on

मुंबई : नीती आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगर प्रदेशात गृहनिर्माण ग्रोथ हब प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ग्रोथ हब प्रकल्पांतर्गत २०३० पर्यंत म्हाडाच्या माध्यमातून सुमारे आठ लाख घरे उभारली जाणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार १४७ सदनिका आणि ११७ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेऊन जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. अशा प्रकारे सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले.

यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाच्या सह अधिक्षक वंदना सुर्यवंशी, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, देखरेख समितीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या स्प्ष्ट सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. ज्यांना आज घरे मिळाली त्यांचे अभिनंदन व ज्यांना नाही मिळाली त्यांना येथील पारदर्शी व्यवस्थेमुळे पुढील लॉटरीत निश्चितपणे घरे मिळतील, असा विश्वास आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांना आणि गरजूंना आपल्या हक्काचे परवडणारे दर्जेदार घर मिळावे, यासाठी शासन कटीबद्ध आहे. अडीच वर्षांपासून या राज्यातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ व लाडके शेतकरी या सर्वांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा वेग आपण वाढविला असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

दरवर्षी राज्यात ३० हजार घरांची लॉटरी

म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात ३० हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन असून दर तीन ते सहा महिन्यांत म्हाडाच्या कुठल्यातरी मंडळाची लॉटरी काढण्याचे प्रस्तावित आहे, असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आपल्या भाषणात सांगितले. गेल्या दीड वर्षातील म्हाडा कोकण मंडळांची ही तिसरी संगणकीय लॉटरी आहे. आगामी नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये म्हाडातर्फे विकास नियंत्रण नियमावली ३३(५), ३३(७), ३३(९), ३३(२४) मध्ये बदल प्रस्तावित केले असून त्या माध्यमातून अधिकाधिक परवडणारी दर्जेदार घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध व्हावीत यासाठीही धोरणात बदल प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in