८ ऑगस्टपासून पश्चिम रेल्वेवर आणखी ८ एसी लोकल धावणार

एप्रिल महिन्यात २२ हजार प्रवाशांच्या तुलनेत जुलै महिन्यात एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४६ हजार ८००
८ ऑगस्टपासून पश्चिम रेल्वेवर आणखी ८ एसी लोकल धावणार

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. येत्या ८ ऑगस्टपासून पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी आठ अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत या लोकल धावणार असल्याने याचा प्रवाशांना चांगला फायदा होणार आहे. या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या ४० वरून ४८ होणार आहेत. येत्या ८ ऑगस्टपासून या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

एसी लोकल प्रवासाच्या तिकिटांचे भाडे कमी केल्यानंतर एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने ८ ऑगस्टपासून मुंबई उपनगरी विभागात एसी लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ८ नवीन एसी सेवा सुरू करण्यात येणार असून एसी सेवांची एकूण संख्या पश्चिम रेल्वेवर आता ४० वरून ४८ पर्यंत वाढेल. अलीकडच्या काळात पश्चिम रेल्वेने २० जूनपासून आणखी ८ एसी लोकल सेवा सुरू केल्या होत्या. यानंतर पुन्हा फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून अतिरिक्त ८ सेवांपैकी प्रत्येकी ४ सेवा अप आणि डाऊन मार्गावर धावणार आहेत.

अप दिशेने विरार – चर्चगेट, बोरिवली – चर्चगेट, मालाड – चर्चगेट आणि भाईंदर – चर्चगेट दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे. त्याचप्रमाणे डाऊन दिशेने चर्चगेट - विरार, चर्चगेट - बोरिवली, चर्चगेट - मालाड आणि चर्चगेट - भाईंदर दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे. या ८ सेवा दिवसभर चालणार आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात २२ हजार प्रवाशांच्या तुलनेत जुलै महिन्यात एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४६ हजार ८०० एवढी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in