मुंबई : एमडी कोर्ससाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतलेल्या सुमारे ८१ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चार जणांच्या एका टोळीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अनिल रामचंद्र तांबट, संदीप वाघमारे, अभिजीत पाटील आणि भूषण पाटील अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवली येथे राहणाऱ्या मंगेश अनंत राणे यांचा मुलगा आदित्यला एमबीबीएसनंतर एमडी कोर्ससाठी प्रवेश हवा होता. याचदरम्यान त्यांची अनिल तांबटसह इतर आरोपींशी ओळख झाली होती. या चौघांनी त्यांच्या मुलाला पुण्याच्या बी. जे वैद्यकीय महाविद्यालयात एनआरआर किंवा शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी एमडी कोर्स प्रवेशासाठी अनिल तांबडला ९४ लाख, अभिजीत पाटीलला साडेआठ लाख, संदीप वाघमारेला २३ लाख तर भूषण पाटीलला ११ लाख असे १ कोटी ३६ लाख रुपये दिले होते. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बोरिवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.