Mumbai : एलफिन्स्टन पूलासाठी घ्यावे लागणार ८२ ब्लॉक, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम आता सुरू झाले आहे. हा पूल पूर्ण पाडण्यासाठी अभियंत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवरून जाणारा हा महत्त्वाचा पूल तोडायला ८२ ब्लॉक घ्यावे लागणार आहेत. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शंभर वर्षे जुना एलफिन्स्टन रोड पूल पाडून त्याच्या जागी डबल डेकर पूल उभारले जाणार आहेत. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (महारेल) हा पूल तोडण्याचे काम करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे ८२ वाहतूक ब्लॉक्सची मागणी केली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा वाढता पसारा लक्षात घेता हे ब्लॉक घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एलफिन्स्टन पूल ११२ वर्षांपूर्वी बांधलेला होता. त्या काळी शहरातील वाहतूक कमी होती. आता मुंबईच्या वाढत्या वाहतूक गरजांसाठी हा पूल अपुरा ठरत आहे. शुक्रवारी रात्रीपासून पूल बंद केल्यामुळे रस्ते वाहतूक करी रोडसह इतर पर्यायी पुलांकडे वळवली आहे. त्यामुळे भारतमाता, लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि दादरमधील टिळक पूल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बेस्टच्या बससेवाही वळवण्यात आल्या असून त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण वाढला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नेमलेल्या ‘महारेल’कडून एलफिन्स्टन पूल तोडून नवीन डबलडेकर पूल उभारणीचे काम टप्प्याटप्प्याने राबवले जाईल. प्रत्येक ब्लॉक किमान चार तासांचा असेल आणि बहुतांश पाडकामाचे काम रात्री होणार आहे. जेणेकरून स्थानिक गाड्यांवर कमीत कमी परिणाम होईल. याशिवाय, काही मोठ्या कामांसाठी दिवसा ब्लॉक्स घ्यावे लागतील.
८०० मेट्रिक टनाच्या क्रेन लागणार
इतर यंत्रसामग्रीबरोबरच दोन प्रचंड ८०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेन जुन्या पुलाचे पाडकाम करण्यासाठी वापरले जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, प्रकल्पादरम्यान पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्यांच्या सेवेत मोठा अडथळा येणार नाही. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर साधारणपणे एक वर्षभरात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नव्या उड्डाणपुलासाठी खांब उभारले गेल्यानंतर बांधकामाचा वेग वाढेल आणि मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या वाहतूक मार्गांपैकी एकाला दिलासा मिळेल,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.