दिवाळीत फटाक्यांची आतषबाजीमुळे तीन दिवसांत आगीच्या ८५ घटना!

गेली दोन वर्षे कोरोनामुळे कुठलाही सण उत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले.
दिवाळीत फटाक्यांची आतषबाजीमुळे तीन दिवसांत आगीच्या ८५ घटना!
Published on

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी होत असून २२ ते २४ ऑक्टोबर या तीन दिवसांत आगीच्या ८५ घटना घडल्या. या घटनांमध्ये ३७ आगीच्या घटना फटाक्यांमुळे लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. या आगीच्या घटनांमध्ये सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नोंद झाली आहे. दरम्यान, दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांना केले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे कुठलाही सण उत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट ओसरल्याने प्रत्येक सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. शनिवारपासून दिवाळी सण साजरा केला जात आहे. शनिवारी २२ ऑक्टोबरला १७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी २ आगी फटाक्यामुळे लागल्या. रविवारी २३ ऑक्टोबरला २७ आगीच्या घटना नोंद झाल्या त्यापैकी ७ आगी फटाक्यामुळे लागल्या. सोमवारी २४ ऑक्टोबरला ४१ आगीच्या घटनांची नोंद झाली, त्यापैकी २८ आगी फटाक्यामुळे लागल्या. दीपावलीदरम्यान दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगीच्या घटना नोंद होतात. यंदाही सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या असल्या, तरी त्यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in