राणा दाम्पत्याविरुद्ध ८५ पानांचे आरोपपत्र दाखल

राणा दाम्पत्य कोर्टात गैरहजर राहिल्याने आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलांना देण्यात आली होती
राणा दाम्पत्याविरुद्ध  ८५ पानांचे आरोपपत्र दाखल
Published on

कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राणा दाम्पत्याविरुद्ध बुधवारी खार पोलिसांनी बोरिवलीतील स्थानिक कोर्टात ८५ पानांचे आरोपपत्र दाखल केले.

त्यात २३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून येत्या गुरुवारी म्हणजेच १६ जूनला नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राणा दाम्पत्य कोर्टात गैरहजर राहिल्याने आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलांना देण्यात आली होती. अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत रवी राणा आणि त्यांचे आमदार पती रवी गंगाधर राणा यांनी मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठणाची घोषण केली होती. या घोषणेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने राणा दाम्पत्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजाविण्यात आली होती. ही नोटीस देऊनही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हनुमान चालीसा पठण करणारच अशी घोषणा केली होती.

त्यामुळे त्यांच्या खार येथील राहत्या घरी खार पोलिसांचे एक विशेष कारवाईसाठी गेले होते. यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने खार पोलिसांनी बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ८५ पानांच्या या आरोपपत्रात २३ जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यात सोशल मिडीयावर व्हायरल झालेले व्हिडीओचा समावेश आहे. आरोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती राणा दामत्यांना देण्यात आली होती. मात्र ते कोर्टात गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांना आरोपपत्राची प्रत देण्यात आली आहे. आता येत्या गुरुवारी १६ जूनला या दोघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in