
मुंबई : मुंबईत प्रथमच या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीच्या कामासाठी तैनात होत असलेल्या महानगरपालिका कर्मचारी- अधिकारी यांचे प्रमाण हे विक्रमी म्हणजे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबईत विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या कर्मचारी ताफ्यातून फारसे मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने महानगरपालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाचा ताण पडला आहे. यातून पालिकेच्या आरोग्य, अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही निवडणूक सेवेचा भार पडल्याने एकीकडे अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या आणि दुसरीकडे निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य निभावून न्यायचे, अशी तारेवरची कसरत महापालिकेच्या प्रशासनाला करावी लागत आहे.
निवडणूक यंत्रणेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘नवशक्ति’ला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाच्या टप्प्यापर्यंत मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे विक्रमी म्हणजे नव्वद टक्के मनुष्यबळ कामाला लागले जाण्याची शक्यता आहे. हा आकडा अगदी ९५ टक्क्यांवरही जाऊ शकतो.
तसे झाल्यास पालिकेच्या आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी मोठीच कसरत करावी लागेल. त्यामुळे शक्यतो पालिका कर्मचाऱ्यांचे हे प्रमाण ८० ते ८२ टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेणार आहे.
आतापर्यंत मुंबईत झालेल्या निवडणुकांच्या कामांसाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी-अधिकारी घेण्याचे प्रमाण हे ६७ टक्क्यांपर्यंत असायचे. यावेळी आताच हे प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मंत्रालय, विक्रीकर विभाग, आयकर विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका यांच्याकडून पाहिजे तसे मनुष्यबळ या वेळी निवडणुकीच्या कामासाठी उपलब्ध झालेले नाही, असे समजते. मुंबईतील शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी यांच्याऐवजी यावेळी प्रथमच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे संपूर्ण पालिका हद्दीतील मतदारसंघांच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या बदलानंतर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील निवडणूक व्यवस्था अत्यंत आदर्श असेल, यासाठी नियोजन केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदान केंद्रांवरील व्यवस्थेविषयी तसेच संथ गतीने काम झाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या होता. त्या लक्षात घेता विधानसभा निवडणुकीसाठी चोख व्यवस्था ठेवण्याकडे गगराणी यांचा कटाक्ष आहे. यासाठी पालिका मुख्यालयात बैठकांची सत्रांवर सत्रे सुरू आहेत. राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून निवडणुकीची तयारी सुरू आहे.
पालिकेचे ५२ हजार कर्मचारी तैनात
-मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी महानगरपालिकेचे ४० ते ४२ हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अर्थात हा आकडा मतदानाच्या टप्प्यापर्यंतचा असेल. यापैकी ४० हजारांहून अधिक जणांना आताच प्रशिक्षणासाठी सूचना पत्रे देण्यात आली आहेत.
-त्याशिवाय झोनल अधिकारी आणि बुथ स्तरीय अधिकारी असे १२ हजार २०० कर्मचारी हे आधीच निवडणूक सेवेत दाखल झाले आहेत. यात ९५०० बीएलओ आणि २७०० झोनल अधिकारी यांचा समावेश आहे.
-पालिकेचे चार हजार शिक्षक निवडणूक सेवेत तैनात झाले आहेत.