पूर्व उपनगरात ९ हजार झाडांचा बळी १७ हजार झाडांचे पुनर्रोपण कुठे हे गुलदस्त्यातच माहिती अधिकारातून उघड

एक झाड कापल्यास तीन झाडे लावणे बंधनकारक आहे
पूर्व उपनगरात ९ हजार झाडांचा बळी १७ हजार झाडांचे पुनर्रोपण कुठे हे गुलदस्त्यातच माहिती अधिकारातून उघड

मुंबई : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी झाडांचे संवर्धन करणे, काळाची गरज आहे. मात्र सरकारी यंत्रणा व खासगी गृहनिर्माण प्रकल्पांसाठी कुर्ला ते मुलुंड पट्ट्यातील गेल्या १० वर्षांत तब्बल ९ हजार झाडांचा बळी दिल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. तर १७ हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ही झाडे कुठे लावली, किती झाडे जगली याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, भांडुप, मुलुंड या पालिकेच्या विभागांमध्ये २०१३ ते २०२३ या दहा वर्षांत किती झाडे कापण्यात आली, किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले, याची माहिती वॉचडॉग फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पालिकेच्या उद्यान विभागाकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात पालिका, एमएमआरडीए, रेल्वे, म्हाडा, आरसीएफ यांसह खासगी गृहनिर्माण बांधकामांसाठी तब्बल ८७७७ झाडे कापण्यात आली असून १६७९८ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आल्याचे म्हटले आहे. पुनर्रोपणापैकी किती झाडे जगली, मृत झाली याची माहिती देण्यात आलेली नाही.

एक झाड कापल्यास तीन झाडे लावणे बंधनकारक आहे. मात्र हे नियम आणि कायदे कागदावरच राहत असून झाडांची बेसुमार कत्तल सुरू असल्याची खंत वॉचडॉग फाऊंडेशने व्यक्त केली आहे. पालिका मुंबईत झाडांची वाढ होत असल्याचा दावा करत असली तरी पूर्व उपनगरातील एकेका भागातून वार्षिक एक हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते हे पर्यावरणासाठी घातक असल्याचे फाऊंडेशनचे ॲॅड. पिमेंटा यांनी सांगितले.

विभाग - झाडांची कत्तल - पुनर्रोपण

एल कुर्ला - ११२३ - ११९२

चेंबूर पूर्व - ९५८ - २१९०

चेंबूर पश्चिम - १४०२ - १६४४

घाटकोपर एन - १२८१ - १८९०

भांडुप एस - २८८७ - ७३४०

मुलुंड टी - ११२६ - २५४२

logo
marathi.freepressjournal.in