मुंबई : सुमारे ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना पवई पोलिसांनी अटक केली. रविंद्र रामेश्वर कोटियन व संजीव दादू पुजारी अशी दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ७० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कॅटरिंगचा व्यवसाय सांभाळत असून त्यांनी आणखी एका व्यवसायात त्यांनी रविंद्र, संजीव आणि नारायण यांच्याशी भागीदार म्हणून करार केला होता.
त्यानुसार त्यांनी मे २०१९ ते जानेवारी २०२३ या कालावधीत रोख स्वरूपात ४६ लाख ५० हजार तर चेक, आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे ४४ लाख ७५ हजार रुपये त्यांना दिले होते. मात्र त्यांच्यात कोणताही करार झाला नाही. अखेर तक्रारदाराने या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता.