कमल मिश्रा/मुंबई : उन्हाळी सुट्टीत बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची उसळणारी गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने यंदा ९१११ गाड्यांच्या फेऱ्या चालवणार आहे. २०२३ मध्ये भारतीय रेल्वेने ६३६९ फेऱ्या सोडल्या होत्या. त्या तुलनेत २०२४ मध्ये रेल्वेने २७४२ अधिक फेऱ्या चालवण्याचे ठरवले आहे.
उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने अधिकाधिक मार्गावर जास्त गाड्या सोडण्याचे ठरवले आहे. तरीही शेकडो प्रवासी रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहेत.
उन्हाळ्याचा काळ हा जगात सर्वात मोठा स्थलांतराचा काळ असतो. त्यामुळेच रेल्वेने उन्हाळ्याच्या काळातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, अधिकाधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात लाखो स्थलांतरित काम प्रवास करतात. ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. शहरातून ग्रामीण भागात हे स्थलांतर होत असते.
या अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करायला रेल्वेचे सर्व विभाग कार्यरत झाले आहेत. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्ली मार्गावर या फेऱ्या चालवल्या जातील. प. रेल्वे जास्तीत जास्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. अतिरिक्त गाड्यांचे नियोजन व चालवणे ही निरंतर प्रक्रिया आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर गर्दीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हे गर्दीचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करतात. तसेच आरपीएफचे जवान जनरल डब्यात प्रवेश देण्यासाठी योग्य प्रकारे रांग लावायला मदत करतात. त्याचसोबत गर्दीवर नियंत्रण ठेवायला सीसीटीव्हीची मदत घेतली जाते.
रेल्वेच्या ब्रीजवर जीआरपी व आरपीएफचे जवान गर्दी नियंत्रित करायला तैनात केले आहेत. चेंगराचेंगरीसदृश स्थिती होऊ नये म्हणून प्रयत्न केले जाणार आहे.
१ कोटी ७५ लाख प्रवासी जागांची तरतूद
रेल्वेतर्फे ९१११ विशेष ट्रेनमधून १ कोटी ७५ लाख अतिरिक्त जागांची तरतूद केली जाणार आहे. देशाच्या महत्त्वाच्या ठिकाणांना यातून जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
रेल्वे खात्याच्या अधिकृत निवेदनानुसार, मध्य रेल्वेवर ४८८ फेऱ्या, प. रेल्वेवर १८७८ फेऱ्या, पूर्व रेल्वेवर २५४ फेऱ्या, पूर्व-मध्य रेल्वेवर १००३ फेऱ्या, १०२ फेऱ्या इस्ट कोस्ट रेल्वेवर, १४२ फेऱ्या उत्तर-मध्य रेल्वेवर, २४४ फेऱ्या उत्तर-पूर्व रेल्वेवर, ८८ फेऱ्या नॉर्थ इस्ट फ्रंटीयर रेल्वे मार्गावर, ७७८ फेऱ्या उत्तर रेल्वेवर, १६२३ फेऱ्या उत्तर-पश्चिम रेल्वे मार्गावर, १०१२ फेऱ्या दक्षिण-मध्य रेल्वेवर, २७६ फेऱ्या दक्षिण-पूर्व रेल्वेवर, १२ फेऱ्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेवर, ८१० फेऱ्या दक्षिण-पश्चिम रेल्वेवर, २३९ फेऱ्या दक्षिण रेल्वेवर व १६२ फेऱ्या प. मध्य रेल्वेवर चालवल्या जातील.