
मुंबई : अल्पवयीन मुलींवर घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना व या प्रकरणांत पोक्सो कायद्याखाली आरोपींविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. १४ वर्षांच्या मुलीला ती कोणती कृती करते व त्याचे भविष्यात काय परिणाम होणार आहे, याची पुरेशी जाण असते, असे स्पष्ट मत न्या. मिलिंद जाधव यांनी व्यक्त करताना पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला.
१४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २४ वर्षांच्या तरुणावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेच्या विरोधात आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
त्या अर्जावर न्या. जाधव यांनी निर्णय देताना पीडित मुलीला तिच्या कृतींमुळे होणाऱ्या परिणामांची जाण होती. संभाव्य परिणाम लक्षात घेण्याइतपत ती मुलगी सक्षम आहे. त्यामुळेच ती स्वेच्छेने आरोपीसोबत चार दिवस राहिली होती, असे निरीक्षण न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवले. पीडितेचा जबाब विचारात घेतला. त्यात तिने आरोपीसोबत संमतीने संबंध ठेवले , असे स्वतः सांगितले आहे.