
मुंबई : माटुंगा बालकल्याण येथून पाठविण्यात आलेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने अंधेरीतील वर्सोवा परिसरात असलेल्या मुलींच्या अनाथश्रमातून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तेथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याने वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे.
अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड, डी मार्टजवळील एका मुलीच्या अनाथश्रमात सध्या १०३ मुली असून त्यातील बहुतांश अल्पवयीन मुली माटुंगा बालकल्याण समिती यांच्याकडून पाठविण्यात आल्या आहेत. तिथे त्यांचे संगोपन आणि देखरेख केली जाते. १० जुलैला पिडीत १७ वर्षांची मुलगी त्यांच्या अनाथश्रमात आली होती. त्यानंतर तिला तेथील शाळेत पाठविले जात होते. मात्र अभ्यासाची आवड नसल्याने ती शाळेत जात नव्हती. तीन दिवसांपूर्वी ती जेवणासाठी आली नाही. त्यामुळे तिला बोलाविण्यासाठी एका महिलेला पाठविण्यात आले होते. मात्र ती तिच्या रूममध्ये नव्हती. सर्वत्र शोध घेतल्यानंतर ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे अनाथश्रमातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता, ती मुलगी सव्वातीन वाजता बुरखा घालून बाहेर जाताना दिसून आली. हा प्रकार निदर्शनास येताच वर्सोवा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावरून या मुलीचा शोध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घेत आहेत.