बाईक अपघातात १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू तर मित्र जखमी

लोअरपरेल येथील अपघात; मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
बाईक अपघातात १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू तर मित्र जखमी

मुंबई : बाईक अपघातात मेहताब साजिद शेख या १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र योगेश नागेश गोरवा (२३) हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरवेगात बाईक चालविण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे उघडकीस आले असून जखमी योगेशविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

हा अपघात रविवारी रात्री पावणेअकरा वाजता लोअर परेल येथील सेनापती बापट मार्ग, कमला मिलसमोरील दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. योगेश आणि मेहताब हे दोघेही मालाड येथील मौलाना आझाद रोड, स्न्वॉर्टर्स कॉलनीत रहिवाशी असून मित्र आहेत. रविवारी रात्री ते दोघेही मुंबई फिरण्यासाठी त्यांच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन माहीम येथून कुलाबाच्या दिशेने जात होते. ही बाईक कमला कमला मिलसमोरुन जात असताना योगेशचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने बाईक डिवायडरला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच ना. म जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी नायर रुग्णालयात दाखल केले. तिथे मेहताब शेखला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जखमी योगेश गोरवा याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.

या अपघाताला योगेश हाच जबाबदार असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून मित्राच्या मृत्यूस तर स्वतला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. योगेशवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in