पोलीस हवालदाराच्या मुलीची आत्महत्या

तक्रारदार पोलीस हवालदार असून सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतिनियुक्तीवर आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत भायखळा परिसरात राहतात.
पोलीस हवालदाराच्या मुलीची आत्महत्या

मुंबई : पोलीस हवालदाराच्या एका २४ वर्षांच्या मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पराग पंकज डाकी या आरोपी तरुणाला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही व्हिडीओ सापडले असून त्यात तिने पराग हाच तिच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

तक्रारदार पोलीस हवालदार असून सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतिनियुक्तीवर आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत भायखळा परिसरात राहतात. सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांची मोठी मुलगी जान्हवी (नावात बदल) हिने राहत्या घरी सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी जान्हवीचा मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यात पोलिसांना तिचे काही व्हिडीओ सापडले होते. या व्हिडीओमध्ये तिने परागमुळे ती मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. पराग तिच्यासह तिची बहिण आणि आईविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामीचा प्रयत्न करत होता. त्याने तिला प्रचंड त्रास दिला असून त्याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असेही तिने एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे माझ्या आत्महत्येला पराग डाकी हाच जबाबदार असल्याचे तिने नमूद केले होते. परागकडून होणाऱ्या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह संभाषणामुळे जान्हवीने आत्महत्या केली होती. हा प्रकार तक्रारदाराच्या निदर्शनास येताच, त्यांनी भायखळा पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in