
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग टास्कद्वारे एका २७ वर्षांच्या नर्सची सुमारे साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आलाद आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार तरुणी ही घाटकोपर येथे राहत असून एप्रिल मध्ये तिने इंन्टाग्रामवर पार्टटाईम नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर तिला एका जाहिरातीच्या माध्यमातून ऑनलाईन नोकरीविषयी विचारणा करण्यात आली होती. तिला एक लिंक पाठवून ऑनलाईन शॉपिंगद्वारे तिला घरबसल्या चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिने ती लिंक ओपन करून तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स शेअर केली होती. त्यानंतर तिला वेगवेगळे ऑनलाईन शॉपिंगचे टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या बँक खात्यात पैसे जमा होत होते. त्यामुळे तिला त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर तिला टास्कसाठी काही रक्कम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या रक्कमेवर तिला चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते.