बसच्या धडकेत ५३ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू शिवडीतील अपघात; बसचालकास अटक

जखमी झालेल्या जाकीरला पोलिसांनी तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले
बसच्या धडकेत ५३ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
शिवडीतील अपघात; बसचालकास अटक

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या एका बसच्या धडकेने जाकीर हुसैन मोडल या ५३ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिंदरपाल मंगल सिंग या बसचालकास शिवडी पोलिसांनी अटक केली. हा अपघात रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता शिवडीतील रे रोड, फॉसबेरी रोडवरील रिलायन्स कंपनीसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जाकीरमुल्ला जुनापअलीमुल्ला हा शिवडी येथे राहत असून, तो मजुरीचे काम करतो. जाकीर हुसैन हा त्याचा भावोजी असून, तो त्याच्या पत्नीसोबत तिथेच राहतो.

जाकीर हा गेल्या एक महिन्यांपासून आजारी होता. त्यामुळे शनिवारी त्याने जाकीरमुल्लाला मेडीकलमधून काही औषध आणण्यास सांगितले होते. घरी आल्यानंतर जाकीमुल्ला हा जाकीरसोबत त्याच्या सायकलवरुन दवाखान्यात जाण्यासाठी निघाले. ही सायल रिलायन्स कंपनीसमोर येताच एका बसने त्यांच्या सायकलला जोरात धडक दिली होती. त्यात जाकीर हा बसच्या चाकाखाली आला आणि गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमी झालेल्या जाकीरला पोलिसांनी तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर बसचालक जखमीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे जाकीरमुल्लाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बसचालक चिंदरपाल सिंग याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. चिंदरपाल हा मूळचा राजस्थानच्या अलवर, रघुनाथगढचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in