
मुंबई : ज्याच्या जीवावर बँकेतील ग्राहकांचे लॉकर असतात त्याच बँक अधिकाऱ्याने ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी बँक अधिकारी दिलीप कुमार चव्हाण याला अटक केली आहे. चव्हाण याने बँकेतील दोन लॉकर फोडून सोन्या व हिऱ्याच्या दागिन्यांची चोरी केली होती.
नेपियन्सी रोडवर राहणाऱ्या मृणालिनी जयसिंघानी यांचे वाळकेश्वरच्या बँक ऑफ इंडियात खाते आहे. त्यांचे बँकेतील लॉकरमधील ३२३ ग्रॅम सोने व हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली. त्याची किंमत ३२.५ लाख रुपये आहे. दीपक नाथवानी यांचेही ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे कळले. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पोलीस उपायुक्त मोहित कुमार गर्ग म्हणाले की, पोलिसांनी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यात बँकेच्या लॉकरचा कस्टोडियन दिलीप कुमार चव्हाण याने ही चोरी केल्याचे आढळले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता चव्हाण चोरी करत असल्याचे दिसले. पोलिसांनी चव्हाणकडून ४८१ ग्रॅम दागिने हस्तगत केले. चव्हाण याच्यावर बँकेतील लॉकरची जबाबदारी होती. त्याने बनावट चाव्या तयार करून हे लॉकर उघडले आणि चोरी केली.