मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राणा दाम्पत्याला मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज फेटाळून लावला. तसेच या प्रकरणी दोघांवर आरोप निश्चिती करण्यासाठी ५ जानेवारीला सुनावणी निशित करून दोघांनाही न्यायालयात हजर राहण्याचे सक्त आदेश दिले.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यात दोषमुक्त करण्याची विनंती करत सत्र न्यायालयात धाव घेतली.
पोलिसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४९ अन्वये बजावलेल्या नोटिशीचे आम्ही पालन केले होते. त्यानंतर ती नोटीस मागे घेतली होती. त्यामुळे कलम १५३(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न उरत नाही, असा दावा राणा दाम्पत्याने केला होता. याला पोलिसांनी जाोरदार आक्षेप घेतला या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा केला होता. याची गंभीर दखल घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याचा अर्ज मंगळवारी फेटाळला.