गणेशोत्सवातून आरे वाचवाची हाक!

आरे कारशेडच्या सजावटीतून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले आहे.
गणेशोत्सवातून आरे वाचवाची हाक!

गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत अनेक सकारात्मक बदल होत आहेत. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला, आज तो उद्देश साध्य होताना दिसत आहे. सजावटीच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषय हाताळले जात असतानाच यंदा प्रतीक्षानगर येथे राहणाऱ्या जान्हवी रोकडे यांनी घरगुती गणरायासाठी ‘आरे वाचवा’सारखा ज्वलंत विषय हाताळला आहे.

जान्हवी रोकडे यांनी आरे कारशेडच्या सजावटीतून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले आहे. प्रतीक्षानगर येथील जान्हवी रोकडे यांच्या घरगुती गणेशोत्सवासाठी खास ‘आरे वाचवा’ ही सजावट करण्यात आली आहे. मेट्रो कारशेड हे आरेतील आदिवासींसह तेथील पर्यावरणाचा ऱ्हास करतील. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोकडे कुटुंबीयांनी हा देखावा साकारला आहे. सजावटीमध्ये एका बाजूला आरे जंगल रेखाटण्यात आले आहे. त्यात गर्द वनराई, महाकाय वृक्ष दाखवले आहेत. त्याचप्रमाणे जंगलातील पशू-पक्ष्यांसह छोटे-मोठे जीवजंतूंचे अस्तित्वही दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या जंगलातील आदिवासींचे पाडे आणि त्यांची संस्कृती हुबेहूब दाखवण्यात आली असून सजावटीच्या दुसऱ्या बाजूला आरेमध्ये अर्धवट सुरू असलेले कारशेडचे काम दाखवण्यात आले आहे.

मेट्रोचे पिलर, मेट्रो मार्ग, मेट्रो रेल्वेस्थानक, सूचनाफलक, जेसीबी दाखवले आहेत. कारशेडच्या कामामुळे नष्ट होणारे जंगल आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे. दोन्ही सजावटींच्या अगदी मधोमध गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यांच्या हातात छोटे रोपटे असणारी कुंडी देण्यात आली आहे. यातून विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे साकडे घालण्यात आले आहे. दरम्यान, जान्हवी रोकडे आणि राहुल रोकडे यांची संकल्पना असलेल्या देखाव्यात मूर्तिकार सुरेंद्र शिंदे यांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in