सात कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा

इमारत प्रोजेक्टसाठी व्याजाने घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून जयेशने एका महिलेसह तिच्या वयोवृद्ध आईची फसवणूक
सात कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा

सुमारे सात कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जयेश विनोद तन्ना या बिल्डरविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इमारत प्रोजेक्टसाठी व्याजाने घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून जयेशने एका महिलेसह तिच्या वयोवृद्ध आईची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

कांदिवली येथे तक्रारदार महिला तिच्या वयोवृद्ध आई आणि भावासोबत राहते. त्यांचा दुबई येथे स्वत:चा व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी त्यांची जयेशसोबत ओळख झाली होती. त्यांच्या बंगल्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात जयेशने मध्यस्थी करून तो बंगला विकत घेण्याचे ठरविले होते. त्यातून त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. जयेश हा बिल्डरने असल्याने त्याने त्याच्या काही प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. त्याच्यावर विश्‍वास ठेवून या महिलेच्या आईने त्याला व्याजाने ५ कोटी ८५ लाख रुपये दिले होते. त्यामोबदल्यात जयेश तिच्या आईला नियमित व्याज देत होता. मात्र २०१७ नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे व्यवसायासाठी व्याजाने घेतलेल्या पैशांची मागणी सुरू केली होती; मात्र तो त्यांना सतत टाळत होता.

जयेशकडून पैसे मिळत नसल्याने त्यांनी त्याच्याकडे त्याच्या कांदिवलीतील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये फ्लॅटसह गाळ्याची मागणी केली होती. त्यास तो तयार झाला आणि त्याने फ्लॅटसह शॉप देण्याचे मान्य केले होते. त्याचे रजिस्टर अग्रीमेंट केले होते; मात्र प्रोजेक्ट काम पूर्ण न झाल्याने त्यांना दिलेल्या मुदतीत शॉपसह फ्लॅटचा ताबा मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने त्याची प्रॉपटी विकून त्यांचे पैसे देण्याचे मान्य केले होते; मात्र त्याने पैसे दिले नाही.

logo
marathi.freepressjournal.in