मुंबई : - म्हाडा घराच्या आमिषाने फसवणुक केल्याप्रकरणी देवदास पांडुरंग शिंदे या आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. देवदासने अशाच प्रकारे अनेकांची फसवणुक केल्याचा प्राथमिक अंदाज असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. ३३ वर्षांच्या तक्रारदार हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत कल्याण येथे राहतात. अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ते हाऊसकिपिंग सुरवायझर म्हणून काम करतात. जानेवारी २०२३ रोजी त्यांची देवदास शिंदेशी ओळख झाली होती. यावेळी त्याने त्यांच्यासह इतरांना सेटींग लावून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखविले होते. म्हाडामध्ये त्याची चांगली ओळख आहेत. म्हाडा अधिकार्यांच्या मदतीने त्यांना मुलुंड टोलनाका येथील म्हाडा वसाहतीत नक्कीच घर मिळेल असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला रुमसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर म्हाडाच्या घरासह विविध कारण सांगून त्यांच्याकडून ऑनलाईन ७ लाख ५५ हजार तर कॅश स्वरुपात ११ लाख २० हजार असे १८ लाख ७८ हजार रुपये घेतले होते. मेलवीन डिसोझा हे म्हाडाचे बडे अधिकारी असून त्यांच्याकडून त्यांच्या घराचे काम होणार आहे. मात्र त्याने त्यांना मेलवीन यांच्याशी कधीच भेट घडवून दिली नाही. दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना घर दिले नाही. तसेच कॉल केल्यानंतर तो त्यांना सतत टाळत होता. देवदास शिंदेकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात देवदास शिंदेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा वांद्रे परिसरात घडल्याने त्याचा तपास नंतर बीकेसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचे कागदपत्रे हाती आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. लवकरच देवदास शिंदे याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.