दिड कोटीच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ;गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप

चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे
दिड कोटीच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ;गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप

मुंबई - सुमारे दिड कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. कुणाल प्रफुल्ल इंदुलकर, प्रणाली प्रफुल्ल इंदुलकर, अनिकेत प्रफुल्ल इंदुलकर आणि रिता जगदाळे ऊर्फ सुवर्णा अशी या चौघांची नावे आहेत. विविध खाजगी कंपनीत गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा या चौघांवर आरोप आहे. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. बोरिवली परिसरात राहणारे तक्रारदारांचा फायनान्सचा व्यवसाय आहे. ते विविध कंपन्यांसह गरजू व्यक्तींकडे कायदेशीर मार्गाने गुंतवणुक करतात. त्यातून त्यांना ठराविक रक्कमेचे व्याज मिळते. माहीम येथे राहणार्‍या प्रफुल्ल आणि त्यांची पत्नी प्रणाली इंदुलकर यांना ते गेल्या सहा वर्षांपासून ओळखतात. त्यांचा मुलगा कुणाल याने त्यांच्याकडे अनेकदा गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली होती.

जून २०२२ रोजी कुणालने त्यांना काही खाजगी कंपन्यांची माहिती देऊन तिथे त्यांना गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या कंपनीमध्ये पार्टनरशीप केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. या कंपन्यांचे आर्थिक उलाढाल पाहिल्यानंतर त्यांना त्याच्यावर विश्‍वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या सांगण्यावरुन संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी प्रफुल्ल आणि प्रणाली यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनीही त्यांना गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी विविध कंपन्यांमध्ये १ कोटी ५४ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यानंतर त्यांचे संबंधित कंपन्यांसोबत कायदेशीर करार झाला होता. या करारानंतर काही दिवसांनी संबंधित कंपनीला भेट देऊन त्यांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा केली होती. मात्र या कंपन्यांनी त्यांच्यासोबत त्यांचा कुठलाही करार झाला नसल्याचे सांगितले. या प्रकारानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी कुणालसह त्याची आई प्रणाली, भाऊ अनिकेत आणि त्यांची सहकारी रिता जगदाळे यांच्याकडे विचारणा केली होती.

मात्र ते दोघेही त्यांना विविध कारण सांगत टाळत होते. गुंतवणुकीवर चांगला फायदा होईल असे या चौघांनी सांगितले होते, मात्र गेल्या एक वर्षांत त्यांनी व्याजाची रक्कमही दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कुणाल, प्रणाली, अनिकेत आणि रिता या चौघांविरुद्ध गुंतवणुकीसाठी घेतलेल्या १ कोटी ५४ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in