व्यावसायिकाला एक कोटींना गंडा घालणाऱ्या चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल

ही रक्कम ट्रान्स्फर झाली नाहीतर त्यांचे एक कोटी रुपये त्यांना परत केले जाईल असे सांगितले
व्यावसायिकाला एक कोटींना गंडा घालणाऱ्या चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : एक कोटीच्या गुंतवणुकीवर दिड कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला सुमारे एक कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या चौकडीविरुद्ध दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुरज विष्णू डे, सिरील दयानंद कुंदर, रेखा दिपक नाईक, आणि भरत कोलगावकर अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हेमेंद्र उमेदमल शहा यांचा गोव्यात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून ते चर्नीरोड येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची भरतशी ओळख झाली होती. त्याने हेमेंद्र शहा यांना तो ट्रेड प्रॉफिट फंडमार्फत गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपये रोख स्वरुपात गुंतवणुक केल्यास तो त्यांना दिड कोटी रुपये देईल, असे सांगितले होते. ही रक्कम त्याच दिवशी त्यांच्या पोरवाल जैन फाऊंडेशनमध्ये जमा होईल. ठरल्याप्रमाणे हेमेंद्र हे पोरचान जैन फाऊंडेशन ट्रस्टी अतुल शहा यांच्यासोबत मालाड येथे एक कोटी रुपयांची रोख घेऊन आले होते. यावेळी भरतने त्यांची ओळख सिरील आणि रेखा या दोघांशी करुन दिली होती. त्यानंतर ते दोघेही त्यांच्यासोबत गोरेगाव येथील एक्सप्रेस झोन इमारतीमध्ये गेले होते. तिथे त्यांची ओळख सुरज डे याच्याशी झाली होती. सुरजने त्यांच्याकडील एक कोटीची रोख घेऊन सायंकाळपर्यंत त्यांच्या पोरवाल जैन फाऊंडेशनला दिड कोटी रुपये ट्रान्स्फर होईल. ही रक्कम ट्रान्स्फर झाली नाहीतर त्यांचे एक कोटी रुपये त्यांना परत केले जाईल असे सांगितले. त्यानंतर हेमेंद्र शहा आणि अतुल शहा हे जेवणासाठी बाहेर निघून गेले. जेवण करुन ते सुरज डेच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना त्याचे कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सुरजला कॉल करुन विचारणा केली असता त्याने उद्यापर्यंत त्यांना दिड कोटी मिळेल असे सांगितले. मात्र दुसर्‍या दिवशी ती रक्कम फाऊनडेशनच्या खात्यात जमा नव्हती. याबाबत पुन्हा विचारणा केल्यानंतर ते चौघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.

फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच हेमेंद्र शहा यांनी घडलेला प्रकार दिडोंशी पोलिसांना सांगून तिथे संबंधित चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुरज डे, सिरील कुंदर, रेखा नाईक आणि भरत कोलगावकर या चौघांविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in