
खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सदर महिलेविरोधात साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, असे शेवाळे म्हणाले.
खासदार शेवाळे यांनी १२ मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे, खासदार शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे, या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.