प्रसूतीदरम्यान चुकीच्या उपचारामुळे नवजात बाळासह मातेच्या मृत्यूप्रकरणी राजावाडी रुग्णालयातील दोन डॉक्टरांविरुद्ध टिळकनगर पोलीस ठाण्यात हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रबज्योत मनचंदा आणि मेघा धर्मदासरी अशी या दोन डॉक्टरची नावे आहेत.
सोहराब अन्सारी हे मूळचे बिहारचे रहिवासी असून सध्या ते नाशिक येथील सावित्री छाया निवासमध्ये राहतात. कंपनीच्या कामानिमित्त तो मुंबई आणि नाशिक येथे राहत होता. त्याची पत्नी गरोदर असताना तिच्यावर नियमित राजावाडी रुग्णालयात औषधोपचार आणि तपासणी सुरू होती. २० सप्टेंबर २०१६ रोजी तिला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या पत्नीची सर्जरी करावी लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर डॉक्टरांनी काही कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी घेतली होती. ऑपरेशननंतर डॉक्टराने त्याला त्याचे मूल मृत झाल्याचे सांगून त्याच्या पत्नीला रक्ताची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना आठ रक्ताच्या बाटल्याची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी चार हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे त्याने आठ रक्ताच्या बाटल्याची व्यवस्था केली होती; मात्र रक्त दिल्यानंतरही त्याच्या पत्नीची प्रकृती गंभीर होती; मात्र सोहराबकडे अधिक रक्ताच्या बाटल्या खरेदीसाठी पैसे नव्हते. तिची प्रकृती अधिक नाजूक झाल्याने तिला तातडीने शीव रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. याच दरम्यान त्याने त्याच्या मुलावर विक्रोळीतील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार केले, तोपर्यंत त्याच्या पत्नीचे ऑपरेशन झाले; मात्र ते ऑपरेशन चुकीचे झाले होते. तशी कबुलीच डॉक्टरांनी त्याला दिली. त्यात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.