३४ लाखांच्या अपहारप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

खाद्यतेलाचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा आरोप
३४ लाखांच्या अपहारप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
Published on

मुंबई : सुमारे ३४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात एक्सुलस फुडब्रेव्ह लिमिटेडच्या तुषार पारेखसह इतर संचालकाचा समावेश असून लवकरच या सर्वांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. खाद्यतेलाचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा या आरोपींवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संजय पुरुषोत्तम अग्रवाल हे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीची हल्दीराम फुड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनीत गेल्या ५० वर्षांपासून देश-विदेशातील मार्केटमध्ये दूध, दूधाचे पदार्थ, बटाटा चिप्स, बिस्कीट्ससह इतर खाद्यपदार्थांची उत्पादन करुन विक्री करते. कंपनीच्या उत्पानाला देश-विदेशात प्रचंड मागणी असल्याने या कंपनीने इतर काही कंपनीना काही उत्पादने तयार करण्याचे कंत्राट दिले होते. त्यात वरळीतील मेसर्च एक्सुलस फुडब्रेव्ह लिमिटेडचा समावेश होता. या कंपनीत तुषार पारेख यांच्यासह इतर लोक संचालक म्हणून काम पाहत होते. या कंपनीला बटाटा चिप्स बनविण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यासाठी दोन्ही कंपनीचा एक संयुक्त करार झाला होता. या कामासाठी त्यांच्या कंपनीने त्यांना ऑक्टोंबर २०२१ रोजी ३४ लाख ३५ हजार रुपयांचे २४ हजार ९७० किलो पामोलिन खाद्यतेलाचा पुरवठा केला होता.

त्यानंतर कंपनीने त्यांना बटाटा चिप्सचे पॅकेट बनवून पाठविले होते. मात्र या चिप्सबाबत अनेक तक्रारी कंपनीला प्राप्त झाले होते. बटाटा चिप्स जास्त प्रमाणात तळलेले होते, चिप्सवर काळे डाग, तेलकट असल्याचे तसेच चिप्सची कापणी योग्य प्रमाणात केली नव्हती. त्यामुळे ते सर्व पॅकेट कंपनीकडे परत आले होते. ते पॅकेट विक्रीसाठी योग्य नसल्याने कंपनीने पुरवठा केलेले खाद्यतेलाची परत मागणी केली होती. मात्र कंपनीने खाद्यतेलाची डिलीव्हरी केली नाही. वारंवार विचारणा करुनही कंपनीकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

अशा प्रकारे एक्सुलस कंपनीने संजय अग्रवाल यांची ३४ लाख ३५ हजाराची आर्थिक फसवणुक केली होती. त्यामुळे कंपनीच्या वतीने त्यांनी विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तुषार पारेख यांच्यसह इतर संचालकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in