अंबरनाथमध्ये एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग

अंबरनाथमध्ये एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला आग लागली. एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळी ९.३०च्या सुमारास अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीतील रितिक केम या केमिकल कंपनीला आग लागली. याबाबत माहिती मिळताच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. या कंपनीत सॉल्व्हंटवर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अग्निशमन दलाने पहिल्यांदा सुरक्षिततेचा उपाय म्हणून सॉल्व्हंटने भरलेले ड्रम कंपनीतून बाहेर काढले.

३० ते ४० टन सॉल्व्हंटचे ड्रम बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले; मात्र ५० ते ६० टन सॉल्व्हंटचे ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सॉल्व्हंटचे ड्रम पेटल्यामुळे आग आणखी भडकली. अग्निशमन दलाने फोम आणि पाण्याचा मारा करून ही आग विझवली.

आग लागली त्यावेळी कंपनीत एकच कामगार कार्यरत होता. त्यावेळी अचानक काहीतरी स्पार्क झाले आणि आग लागली, अशी माहिती कामगाराने दिल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी नलावडे यांनी सांगितले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in