
मुंबई : नोकरीच्या आमिषाने एका तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी संदेश प्रकाश वाकचौरे या आरोपीविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. संदेश हा तक्रारदार तरुणीचा नातेवाईक असून, त्याने तिच्या चुलत बहिणीसह भावाला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख ३६ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत लवकरच संदेशची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका खासगी बँकेत कामाला असलेली तक्रारदार तरुणी ही गोरेगाव येथे राहते. ती मूळची अहमदनगरख्या संगमनेर, पिंपरण गावची रहिवाशी असून संदेशने तो आयकर विभागात अधिकारी पदावर काम करतो असे सांगून त्याचे काही शासकीय विभागात चांगली ओळख असल्याचे सांगितले होते.
तसेच तिच्या चुलत बहिणीसह भावाला शासकीय किंवा महानंदामध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्याने तिला फोन करुन काही नोकरीसाठी काही शासकीय जागा उपलब्ध असल्याचे सांगून तिच्या बहिण आणि भावाचे शैक्षणिक प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे मागवून घेतले होते. त्यासाठी त्याने तिच्याकडून ५ लाख ३६ हजार रुपये घेतले होते.