गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळला मृतावस्थेत बिबट्या

डोक्याला मार लागल्याने त्याच्या मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांनी वर्तविला आहे
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळला मृतावस्थेत बिबट्या

गोरेगाव फिल्मसिटीतील एका सेटवर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडली. याबाबत ठाणे वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यामुळे तातडीने ठाणे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

हा बिबट्या आजारी असावा आणि डोक्याला मार लागल्याने त्याच्या मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांनी वर्तविला आहे. फिल्मसिटीमधील व्हिसलिंग वूडच्या सेटवर बिबट्या मृतावस्थेत असल्याचे तेथील कामगारांच्या लक्षात आले. १२ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर ठाणे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, असे गिरिजा देसाई यांनी सांगितले. मृत बिबट्याचे वय नऊ महिने असून प्राथमिक अहवालानुसार बिबट्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे समोर आले आहे. शिवाय त्याच्या डोक्याला मुका मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत.

बिबट्याच्या डोक्याला मुका मार कसा बसला हे अद्याप समजू शकलेले नाही. कदाचित, आजारी बिबट्या झाडावरून पडल्याने त्याला मार बसल्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक नियुक्त केले आहे. त्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ही गिरिजा देसाई यांनी दिली.एसजीएनपी आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकांच्या पथकाने शवविच्छेदन केले. प्रथमदर्शनी निष्कर्ष श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे, अशक्तपणा आणि त्वचेखालील रक्तस्रावासह डोक्याला आघात हे मृत्यूचे संभाव्य कारण प्रथमदर्शनी दिसून आलेले आहे. याबाबत माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. इतर नमुने पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जातील असे सनॅशनल पार्कचे सहाय्यक आयुक्त वन्यजीव डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in