जेवणामध्ये मृत उंदीर सापडला

वांद्रे येथील पापा पन्चो दा ढाबा हॉटेलच्या मॅनेजरसर शेफला अटक
जेवणामध्ये मृत उंदीर सापडला

मुंबई : जेवणामध्ये मृत उंदीर सापडल्याने वांद्रे पोलिसांनी ‘पापा पन्चो दा ढाबा’ हॉटेलच्या मॅनेजरसह आचाऱ्याला आणि चिकन पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच मॅनेजरसह शेफ अशा दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांची वांद्रे येथील लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे.

रविवारी १३ ऑगस्ट रोजी पाली रोडवरील पापा पन्चो दा ढाबा या हॉटेलमध्ये ही घटना घडली. मध्य प्रदेशचे रहिवासी असलेले अनुराग सिंग रविवारी मित्रांसोबत या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या जेवणामध्ये एक मृत उंदीर आढळून आला. या प्रकाराने सुरुवातीला त्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी हॉटेलच्या मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा याच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावेळी मॅनेजरने प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र प्रचंड संतापलेल्या अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलिसांना हा प्रकार सांगून तिथे संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली होती.

या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत हॉटेलचा मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा यांच्यासह हॉटेलचा आचारी आणि चिकन पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध २७२, ३३६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरसह आचाऱ्याला अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in