
मुंबई : मुलाच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप करुन रुग्णालयात घुसून एका महिला डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण झाल्याचा प्रकार डोंगरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन बुरखाधारी महिलांसह पती-पत्नीविरुद्ध डोंगरी पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. नाजिया शागीर शेख आणि शागीर शेख अशी या पती-पत्नीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. अनघा डॅनी लालीवाला यांचे पती डॉक्टर असून, त्यांचा स्वतचे क्लिनिक आहे. नाजिया ही जुनी पेशंट असून, गरोदर राहिल्यानंतर ती त्यांच्याकडे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी येत होती. जून महिन्यांत तिचे सिझरिंग झाले होते. तिने एका मुलाला जन्म दिला होता. त्याचे हार्टबीट व्यवस्थित नसल्याने त्याला ऑबजरवेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तिथेच त्याचे निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूनंतर शेख कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला होता. यावेळी डॉ. अनघा यांना शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना मारहाण करून धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार डोंगरी पोलिसांना सांगून नाजियासह तिचा पती शागीर व अन्य दोन महिलांविरुद्ध तक्रार केली होती.