
रेबीज आजार हा जीव घेणा असून कुत्रे रेबीज आजार मुक्त करण्यासाठी पालिकेच्या देवनार पशुवधगृहाने विशेष मोहीम हाती घेतली होती. २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान या मोहिमेअंतर्गत ३,३०७ कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीम पठाण यांनी दिली.
प्राण्याने विशेषतः कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज हा आजार होतो. हा आजार जीवघेणा असला तरी वेळीच उपचार घेतल्यास रुग्णाचा जीव वाचला जाऊ शकतो. त्यामुळे २८ सप्टेंबर या जागतिक रेबीज दिनानिमित्त मुंबईत २६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत रेबीज लसीकरण मोहीम हाती घेतली होती. मुंबईत तीन लाखांहून अधिक कुत्रे आहेत. रेबीज आजार हा प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे 'रेबीज'. हा आजार अत्यंत जीवघेणा आहे. रेबीज आजार झाल्यानंतर वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे जनावरांना विशेषतः कुत्र्यांना होणाऱ्या रेबीज आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवली.
या मोहिमे अंतर्गत रेबीज आजाराचे १०० टक्के प्रतिबंध करणे आहे. या मोहिमेत बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील प्राणी प्रेमी नागरिक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राणी कल्याण संस्था देखील सहकार्य केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कुत्र्यांना रेबीज इंजेक्शन देण्याची मोहीम यापुढे ही सुरु राहणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.
दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यू
मुंबईसह देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी देशात २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाजे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे. तसेच, विशेष व धक्कादायक बाब म्हणजे देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते.