दारुच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

रात्री धोंडीराम दारु पिऊन आला व दीपाली हिच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडण झाले
दारुच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

कराड : म्हसवड शहरात २९ वर्षीय विवाहितेचा दारुच्या नशेत पतीने पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून भिंतीवर डोके आपटून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघड झाली असून, पतीला म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. दीपाली धोंडीराम पुकळे असे मृत पत्नीचे तर धोंडीराम पुकळे असे खून केलेल्या दारुड्या पतीचे नाव आहे.

दीपाली धोंडीराम पुकळे हिचा विवाह धोंडीराम पुकळे याच्याबरोबर झाला होता. धोंडीराम व पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात कवी वस्ती नजीक एका बिल्डिंगमध्ये भाडोत्री राहत होते.दीपाली पदवीधर होती, त्यामुळे ती एमपीएससीचा अभ्यास करत होती. दीपाली व धोंडीराम यांना ८ व ९ वर्षाचा अशी दोन मुले आहेत. शनि. रात्री धोंडीराम दारु पिऊन आला व दीपाली हिच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात धोंडीराम यांने दीपालीचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटल्याने तिच्या कानातून व नाकातून रक्त आल्यावर तिचा जागीच मृत्यू झाला होता; मात्र पतीने ती मृत असल्याचे कोणाला कळू नये म्हणून तिला बेडवर झोपवले व लहान मुलांनाही झोपवले आणि आपण रात्रभर त्यांच्या शेजारी बसून राहिला.सकाळी मुलांना धोंडीरामनेच चहा-बिस्किटे दिली. मुले आईला उठवत असताना रोज भांडणे झाल्यावर रागारागाने आई झोपते, त्याप्रमाणे झोपली आहे असे मुलांना वाटले. त्यानंतर धोंडिरामने मुलांना ११ च्या दरम्यान खेळण्यासाठी बाहेर पाठवले. आपणही दुपारी दोनच्या दरम्यान बाहेर गेला. त्यावेळी मुले घरी आली. त्यांनी आईला उठवण्याचा प्रयत्न केला.मात्र आई उठत नाही म्हणून ती रडू लागली. यानंतर शेजारपाजारचे लोक जमा झाले.त्यांनी पाहिले असता दीपालीचा श्वास बंद पडला होता. याबाबत कोडलकरवाडी येथील दीपालीच्या आई-वडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी आले. त्यांनी या घटनेची माहिती म्हसवड पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला; मात्र ,पत्नीचा खून करून पती फरार झाला होता. म्हसवड पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in