लालबागच्या राजाला ७२ हजारांचा दंड ; प्रती खड्डा २ हजार रुपये

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन करत मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला होता.
लालबागच्या राजाला ७२ हजारांचा दंड ; प्रती खड्डा २ हजार रुपये

मुंबई : मंडप परिसरात ३६ खड्डे निदर्शनास आल्याने पालिकेच्या एफ. साऊथ विभागाने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजा मंडळाला प्रती खड्डा २००० रुपये याप्रमाणे ७२ हजारांचा दंड भरण्याची नोटीस बजावल्याचे पालिकेच्या एफ. साऊथ विभागाकडून सांगण्यात आले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन करत मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला होता. मंडप परिसरात खड्डे आढळल्यास प्रती खड्डा २००० रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला होता. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडप परिसरात तब्बल ३६ खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला एफ. साऊथ विभागाने प्रती खड्डा २००० रुपयेप्रमाणे ७२ हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली. पालिकेची नोटीस मिळताच लालबागच्या राजा मंडळाने ७२ हजार रुपये दंडाची रक्कम भरल्याचे एफ. साऊथ विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध परवानगी देतानाच पालिका मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट केले जाते. लालबागच्या राजा मंडळाला दरवर्षी खड्डे पडल्याने नोटीस बजावण्यात येते. यंदाही ३६ खड्डे मंडप परिसरात पाडल्याने नोटीस बजावण्यात आली असता दंडाची ७२ हजारांची रक्कम भरल्याचे महेश पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in