मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस सामील होत आहेत. बेस्टकडे २७ बस डेपो असून प्रत्येक डेपोत एसी बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत. गोराई बस आगारात ओलेक्ट्रा कंपनीच्या १०० एसी बसेसचा ताफा दाखल होणार असल्याने बोरिवली, गोराईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला असून अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत. स्मार्ट कार्ड, प्रीमियम बस सेवा अशा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा, यासाठी एसी बसेसची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या २,१०० एसी बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. सध्या उपलब्ध बसेसपैकी धारावी येथील काळा किल्ला येथे १०० व मुंबई सेंट्रल बस आगारात १०० बसेस प्रवासी सेवेत धावत आहेत. विशेष म्हणजे, आणखी १०० एसी बसेस ताफ्यात टप्याटप्याने दाखल होणार असून या बसेस गोराई बसडेपोतून प्रवासी सेवेत धावणार आहेत.
या बस मार्गांवर धावणार!
१२ मीटर लांबीच्या या बसेस संपूर्ण वातानुकूलित असून या बसमधून प्रवासा आरामदायक होणार आहे. प्रथम या बस ४६१ मार्गावर चारकोप ते मुलुंडदरम्यान धावणार असून त्यानंतर ४६० मर्यादित (मुलुंड) २०२ मर्यादित, (माहीम) २२६ मर्यादित बरवे नगर घाटकोपर व नंतर चारकोप ते कांदिवली व बोरिवली या कमी अंतराच्या मार्गावर धावणार आहेत.