आकर्षक व्याजदराच्या आमिषाने पावणेचार कोटी रुपयांची फसवणुक

कंपनीच्या संचालकाकडून ९१ गुंतवणुकदारांची फसवणुक करुन पलायन
आकर्षक व्याजदराच्या आमिषाने पावणेचार कोटी रुपयांची फसवणुक

मुंबई : आकर्षक व्याजदराच्या आमिषाने सुमारे पावणेचार कोटी रुपयांची फसवणुक करुन एका खाजगी कंपनीच्या संचालकांनी पलायन केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. आतापर्यंत कंपनीने ९१ गुंतवणुकदारांची फसवणुक केली असून हा आकडा तसेच फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. याप्रकरणी सिद्धार्थ प्रॉफिट हाऊस कंपनीसह संचालक उमेश रामधन रायपुरे व इतरांविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध आहे. अंधेरीतील जे. बी नगर, भारत गॅस बुकिंग सेंटरजवळल जय गणेश प्लाझा अपार्टमेंटमध्ये सिद्धार्थ प्रॉफिट हाऊस कंपनीचे एक कार्यालय असून या कंपनीचे मुख्य कार्यालय जळगाव येथील भुसावळ शहरात आहे. ही कंपनी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करुन कंपनीत गुंतवणुक करणार्‍या गुंतवणूकदारांना प्रत्येक दिवशी दिड टक्का व्याजदर देत होती. कंपनीचे विविध योजना सुरु असून प्रत्येक योजनांमध्ये गुंतवणुकदारांना चांगले आकर्षक व्याजदाराचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यातील एका योजनेत तक्रारदार शफी हुसैन पटेल यांनी सहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना प्रत्येक दिवशी दिड टक्का व्याजदराचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांना सहा लाखांवर प्रत्येक दिवशी नऊ हजार तीनशे रुपये मिळतील, मात्र ही रक्कम त्यांना सहा महिने काढता येणार नाही असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत त्यांना कंपनीकडून गुंतवणुक रक्कमेवर व्याजदर मिळाले. मात्र ऑक्टोंबर २०२२ नंतर त्यांना व्याजाची रक्कम मिळणे बंद झाले होते. वारंवार कॉल करुनही त्यांना कंपनीसह संचालक उमेश रायपुरेकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. चौकशीदरम्यान त्यांच्यासह ९१ गुंतवणुकदारांनी कंपनीत ३ कोटी ७६ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यातील काहींना काही महिने व्याजदर मिळाले होते. मात्र नंतर सर्वांना व्याजदर मिळणे बंद झाले होते. अशा प्रकारे कंपनीने आकर्षक व्याजदाराचे गाजर दाखवून अनेक गुंतवणुकदारांची फसवणुक करुन कंपनीला टाळे लावून पलायन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच शफी पटेल यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कंपनीसह उमेश रायपुरे व इतर संचालकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या संचालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपासकामी अंधेरी पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच जळगाव येथे जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in