
मुंबई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चारजणांच्या एका टोळीला कांदिवली पोलिसांनी अटक केली. नासीरअली बाबरअली मुल्ला, कमलप्रकाश पद्मसिंग यादव ऊर्फ कमल, राममूर्ती रविंद्रनाथ अय्यर आणि इसराईत मुन्ना खान अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी त्यांचा एक सहकारी सोनू हा पळून गेला असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कांदिवली परिसरात काही तरुण दरोड्यासाठी येणार असून, ते सर्वजण एसडी रोड, महाजनवाडीतील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दरोडा घालणार आहेत, अशी माहिती पोलीस हवालदार जगदाळे यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या पथकातील एपीआय हेमंत गिते, अंमलदार जगदाळे, जैतापकर, गावकर, तावडे, राऊत, हिरमेठ आणि घोडके यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे तिथे रिक्षातून पाचजण आले होते. या सर्वांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले तर एक आरोपी गल्लीतून पळून गेला.