मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना स्वस्त प्रवासाची भेट

शिवाई बसचे प्रवासासाठी ३५० रुपये दर प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना स्वस्त प्रवासाची भेट

‘शिवाई’मधून सर्वसामान्यांना प्रवास करता यावा यासाठी निमआराम श्रेणीतील तिकीटदर प्रवाशांच्या खिशाला परवडतील असे लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. विद्युत बस असलेल्या ‘शिवाई’मधून सर्वसामान्यांना प्रवास करता यावा यासाठी ‘शिवाई’चे मुंबई-पुणे प्रवासासाठी ३५० रुपये दर प्रस्तावित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिल्या. त्यानुसार हे दर लागू करण्यात आले असून यामुळे मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या एसटीच्या लाखो प्रवाशांना नव्या वर्षात स्वस्त प्रवासाची भेट मिळणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावर प्रतिदिन लाखो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. रेल्वेगाड्या, खासगी बसगाड्यांसह एसटी बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई-पुणे मार्गावर २००२ मध्ये ‘शिवनेरी’ बससेवा सुरू झाली आहे. सध्या सुमारे १०० ‘शिवनेरी’ एसटी ताफ्यात आहेत. ‘शिवाई’च्या संपूर्ण गाड्या आल्यानंतर ‘शिवनेरी’ गाड्या राज्यातील अन्य मार्गावर चालवण्यात येणार आहेत. एसटीच्या आरामदायी एसी श्रेणीतील शिवनेरी मुंबई-पुण्यावर धावते. या गाडीचे मुंबई-पुणे तिकीट सुमारे ५०० रुपये आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना हे दर परवडत नसल्याने शिवनेरी बसेस बहुतांशवेळा रिकाम्या धावत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एसटी महामंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘शिवाई’मधून सर्वसामान्यांना प्रवास करता यावा यासाठी निमआराम श्रेणीतील तिकीटदर प्रवाशांच्या खिशाला परवडतील असे लागू करण्याचा निर्णय घेतला. तशा सूचना अधिकाऱ्यांना देत नवीन वर्षात हे दर लागू होणार आहेत. यामुळे एसटीचा एसी प्रवास निमआराम श्रेणीतील प्रवाशांच्या आवाक्यात येणार आहे.

चार्जिंग स्टेशन उभारण्याची कामे वेगाने सुरू

येत्या पंधरवड्यात ठाणे खोपट बस स्थानकातील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण होईल. दादर, ठाणे, बोरिवली, पुणे येथे चार्जिग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून विद्युत बस एसटी ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे, असे विद्युत बसपुरवठादार असलेल्या ऑलेक्ट्रा कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in