मुंबईत हिरवळीची चादर; वर्षाला सरासरी एक लाख झाडांचे रोपण

दोन झाडांचे रोपण करणे तसेच काही झाडे पुनर्रोपित करण्याच्या अटींवर महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात येते
मुंबईत हिरवळीची चादर; वर्षाला सरासरी एक लाख झाडांचे रोपण

पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणावर झाडांची लागवड केली जात असून गेल्या १० वर्षांत झाडांच्या संख्येत १० लाखांनी वाढ झाली आहे. सन २०११-१२ मध्ये महापालिकेच्या नोंदीवर १९ लाख १७ हजार ८४४ झाडे होती. आता २०२१-२२ मध्ये एकूण झाडांची नोंद २९ लाख ७५ हजार २८३ एवढी आहे. त्यामुळे वर्षाला सरासरी एक लाख झाडांचे रोपण होत असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत इमारत बांधकाम तसेच पुनर्विकासांमध्ये झाडे कापली जातात. एका झाडाच्या बदल्यात दोन झाडांचे रोपण करणे तसेच काही झाडे पुनर्रोपित करण्याच्या अटींवर महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात येते, परंतु प्रत्यक्षात विकासकांकडून काही झाडे महापालिकेची परवानगी मिळण्याच्या दृष्टीकोनातून लावली जातात; मात्र पुढे त्या झाडांकडे तेवढ्या काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही. विकासकांना परवानगी मिळाली की कशीही झाडे कापली जातात. दुसरीकडे वृक्षांचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी एक लाखांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, सन २०२१-२२ मध्ये रस्त्यालगत तसेच महापालिकेच्या अखत्यारित उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवर ४० हजार २३ वृक्षांची लागवड केली आणि सन २०२२-२३ मध्ये २५ हजार झाडे लागवडीचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे, परंतु सन २०११-१२ आणि सन २०२१-२२ मधील झाडांची एकूण आकडेवारी पाहता दहा वर्षांमध्ये केवळ १० लाख झाडांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते. यामध्ये मुलुंड टी वॉर्डमध्ये केवळ ८ हजार एवढीच झाडे वाढल्याचे पहायला मिळत आहे. २०११-१२ मध्ये मुलुंडमध्ये ७६ हजार २०९ एवढी झाडे होती आणि सन २०२१-२२ मध्ये या झाडांची संख्या ८४ हजार १८७ एवढी आहेत.

सध्या जी एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत, त्यात पश्चिम उपनगरांमध्ये १२ लाख २१ हजार ७३७ आणि पूर्व उपनगरांमध्ये १० लाख ३४ हजार ९५७ एवढी झाडे आहेत, तर शहरांमध्ये ७ लाख १८ हजार ५८९ एवढी झाडे आहे.

मियावकी पध्दतीने मुंबईत दोन लाख ६० हजार ४९५ झाडे

मियावकी पध्दतीने संपूर्ण मुंबईत मागील वर्षांपर्यंत २ लाख ६० हजार ४९५ एवढी झाडे लावली गेली आहेत. त्यात पूर्व उपनगरांमध्येच सव्वा दोन लाख झाडे लावली गेली आहेत. तर पश्चिम उपनगरांमध्ये ८ हजार आणि शहरांमध्ये सुमारे १५ हजार एवढी मियावकी झाडे लावली गेली आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in