किराणा व्यापार्‍याला ४० लाखांच्या खंडणीसाठी धमकी ;व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
किराणा व्यापार्‍याला ४० लाखांच्या खंडणीसाठी धमकी ;व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई - किराणा व्यापार्‍याला अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे ४० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली आहे. याप्रकरणी व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन साकिनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ५१ वर्षांचे तक्रारदार किराणा व्यापारी असून ते साकिनाका परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. याच परिसरात त्यांचा आशापुरा ट्रेडर्स नावाचे एक किराणा दुकान आहे. बुधवारी १३ डिसेंबरला ते सकाळी दहा वाजता दुकानात आले होते. यावेळी त्यांना तिथे लिफाफा दिसला. त्यांनी लिफाफा उघडून पाहिले असता त्यात एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत अज्ञात व्यक्तीने हिंदीत धमकीवजा इशारा दिला होता. उद्यापर्यंत ४० लाख रुपये तयार ठेव. माझा माणूस उद्या दुकानात येईल, त्याच्याकडे पैसे दे नाहीतर माझे माणसे तुझ्या पत्नीसह मुलावर नजर ठेवून आहेत. मुलगा कुठल्या कॉलेजमध्ये जातो, मुलगी कुठल्या ऑफिसला जाते, पत्नी जेवणाचा डब्बा घेऊन किती वाजता येते आदी सर्व घटनांवर माझी नजर आहे. याबाबत पोलिसांत तक्रार केली तर तुझी पत्नी कुठे आणि कशी गायब झाली हे कळणार नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार तूच राहशील असे नमूद केले होते. या पत्राने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या भावाला सांगितला. त्यानंतर ते दोघेही साकिनाका पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना धमकीचे पत्र दाखविले. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in